नांदरच्या साक्षी संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव सोहळा…
पैठण, दि. २१ :अभिजीत सोनवणे
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि संत एकनाथ महाराज यांच्या पावन भूमीवर वसलेले श्रीक्षेत्र रेणुकादेवीचे तीर्थस्थान असलेले नांदर हे गाव नेहमीच समाजकारण, शिक्षण, आणि सामाजिक कार्यातील योगदानासाठी ओळखले जाते. या परंपरेला पुढे नेत “साक्षी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, नांदर” यांच्या वतीने “अभिमान गावाचा, सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचा” या उपक्रमांतर्गत विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यात नांदर व परिसरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार संदीपान भुमरे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. आमदार विलास भुमरे कार्यक्रमाध्यक्ष म्हणून तर प्रमुख उपस्थिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपजिल्हाधिकारी अविनाश लोंढे,तहसीलदार ज्योती पवार, शल्य चिकित्सक डॉ एन. डी. कुलकर्णी यांची लाभणार आहे.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र काळे, सुनील पाटील, सचिन पंडित, व प्रा. संतोष तांबे हे मान्यवर उपस्थित राहतील.
हा सोहळा रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ७:०० वा. श्रीक्षेत्र नांदर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन साक्षी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष माजी सरपंच प्रा. संदीप काळे यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच विजय गायके, उपसरपंच अस्मानदादा काळे, अनिल काळे, आणि मच्छिंद्र मिसाळ यांनी केले आहे.या उपक्रमाद्वारे नांदर गावाने समाजहिताचे संस्कार, प्रेरणा आणि कार्यगौरवाचा नवा आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत सुरू आहे.




















