सोनईतील घटनेच्या निषेधार्थ लोक स्वराज्य आंदोलनाची पदयात्रा; विखे पाटील यांच्याशी फोनवर चर्चा
अहिल्या नगर, दि. ४ : दिलीप गायकवाड
अहिल्या नगर जिल्ह्यात दलितांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, हा जिल्हा ‘दलित अत्याचारग्रस्त जिल्हा’ घोषित करण्यात यावा, तसेच सोनई घटनेतील दोषींना त्वरीत अटक करण्यात येवुन कारवाई करण्यात यावी; पोलिस केस दाखल करून घेण्यास टाळाटाळ करणा-या पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे,अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामचंद्र भरांडे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नेवासा तालुक्यातील सोनई येथील मातंग समाजातील युवक संजय वैरागर याच्यावर गावातील सुवर्ण समाजातील दहा-बारा युवकांनी अमानुष मारहाण करून गाडी चढवली तसेच डोळ्यावर चाकूने वार केल्याची गंभीर घटना नुकतीच घडली. या घटनेनंतर दलित संघटनांनी संतप्त होत रास्ता रोको आंदोलन केले.
या प्रकरणात लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने प्रा. भरांडे यांच्या नेतृत्वाखाली सोनई ते लोणी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान आंदोलनकर्त्यांनी अत्याचारग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी सोनई पोलीस ठाण्याचे निरीक्षक माळी यांनी तातडीने कारवाई करण्याचे हे राहुरी साखर कारखाना, गुहा फाटा, चिंचोली फाटा आणि कोल्हार येथील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नितीन पोळ म्हणाले, “अन्याय सहन करण्याऐवजी समाज बांधवांनी संघर्षाची तयारी ठेवावी.”
लोणी येथे पोलिसांनी पदयात्रेला अडवले. मात्र आंदोलकांनी विखे पाटील यांना निवेदन देण्यावर ठाम भूमिका घेतल्याने एक तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. अखेर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डीचे पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी मध्यस्थी केली.
विखे पाटील हे नियोजित दौऱ्यानिमित्त बाहेर असल्याने फोनवर प्रा. भरांडे यांच्याशी चर्चा झाली. या चर्चेदरम्यान प्रा. भरांडे यांनी दलितांवरील वाढत्या अत्याचारांचा तपशीलवार उल्लेख करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्यावर विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कारवाईचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.
या पदयात्रेत ॲड. नितीन पोळ, ज्ञानेश्वर जगधने यांच्यासह सोनई, उंब्रे, राहुरी, राहुरी फॅक्टरी, गुहा, चिंचोली व कोल्हार येथील समाज बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.




















