स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी कोपरगाव काँग्रेस सज्ज; संगमनेर येथे बैठक संपन्न
कोपरगाव, दि. ११ : दिलीप गायकवाड
“संघटन बळकट करून जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकवा,” असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कोपरगाव काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आज संगमनेर येथे थोरात यांच्या उपस्थितीत पार पडली. आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत निवडणूक तयारी, रणनीती आणि संघटन बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
थोरात म्हणाले, “काँग्रेस पक्ष जनतेच्या मनात आजही आहे. आपल्याला फक्त संघटनात्मक एकजूट राखून कार्य करायचे आहे. कार्यकर्त्यांनी लोकाभिमुख कामे प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि पक्षाच्या धोरणांवर विश्वास निर्माण करावा.”
या बैठकीत ठरविण्यात आले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी आणि स्वबळावर सर्व ठिकाणी उमेदवार उभे करेल. तसेच कोपरगाव येथे लवकरच निरीक्षक नेमून उमेदवार निवड प्रक्रिया व रणनीती आखली जाणार असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले.
बैठकीस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष तुषार पोटे, माजी नगरसेवक बाबुराव पहिलवान ऊर्फ कैलास पंडोरे, किसान काँग्रेसचे विजय जाधव, रौणक अजमेरे, निलेश चांदगुडे, विष्णू पाडेकर, शब्बीर शेख, सचिन होन, राजूभाई पठाण, ज्ञानेश्वर भगत, बाबूराव पवार, सोपान धेनक, सोमनाथ पगारे, संजय त्रिभुवन यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात साहेबांच्या मार्गदर्शनामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, आत्मविश्वास आणि लढाऊ वृत्तीचा नवा संचार झाला आहे. आगामी निवडणुकांत काँग्रेस पक्ष पुन्हा बळकट होणार, अशी भावना किसान सेलचे विजय जाधव यांनी व्यक्त केली.




















