मध्य प्रदेशातून २.२४ कोटींचे एमडी ड्रग्स आणणारे चार तस्कर अटकेत
ठाणे, दि.१३ : अजय मगरे
ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनटीएस) मोठी कारवाई करत मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात एमडी (मॅफेड्रॉन) अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघा आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल २.२४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला असून, ठाणे पोलिसांची ही कारवाई मोठी धडक मानली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून एकूण १ किलो ७१ ग्रॅम ६ मिलीग्रॅम एमडी ड्रग्स आणि वापरातील वाहन असा एकूण २, कोटी २४ लाख ७५,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी एमटीएनएल कार्यालयासमोर, चरई, नौपाडा, ठाणे येथे सापळा रचून आरोपी
इम्रान उर्फ बब्बू खिजहार खान (३७) वकास अब्दुलरब खान (३०)ताकुददीन रफीक खान (३०)कमलेश अजय चौहान (२३) सर्व राहणार मध्यप्रदेश या
आरोपींना पकडण्यात आले.

अटक आरोपींपैकी दोघे हे आधीपासूनच रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्यावर मध्यप्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे.
ठाणे पोलिसांनी या कारवाईतून अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील आपली कडक भूमिका पुन्हा अधोरेखित केली असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे




















