मुंबई दि. १० : मंगेश म्हात्रे
“तो आला… त्याने पाहिलं… आणि सूत्र हातात घेतली!” – ही वाक्य सायनमधील एका कुटुंबासाठी अक्षरशः खरी ठरली आहेत .सायन प्रतीक्षा नगरचे भाजपचे मंडळ अध्यक्ष दत्ता केळुसकर यांच्या तत्परतेमुळे प्रतीक्षा नगरमध्ये राहणाऱ्या आनंद केबानी या तरुणाला नवजीवन लाभले.

आनंद यांना अचानक छातीत वेदना जाणवू लागल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने एस.आर.मेहता रुग्णालयात दाखल केले. तपासणीनंतर डॉक्टरांनी २४ तासांच्या आत शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे सांगत सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचा खर्च कळविला. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी इतक्या मोठ्या रकमेची जमवाजमव करणे अशक्यप्राय होते.पत्नीने दागिने गहाण ठेवून १० लाख रुपये जमवले, मात्र उर्वरित रक्कम मोठा प्रश्न ठरली.
कठीण प्रसंगी परिचितांच्या सल्ल्याने दत्ता केळुसकर यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत केळुसकर थेट आमदार तामिळ सेलवन यांच्याकडे गेले. आमदारांनी तत्काळ डॉक्टरांशी चर्चा करून केबानी कुटुंबाला आधार दिला आणि संपूर्ण शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारली.
यानंतर आनंद यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांत डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले. केळुसकर आणि आमदार सेलवन यांच्या सक्रियेतेमुळे केबानी कुटुंबाला केवळ आनंद परत मिळालाचं आणि आर्थिक संकटातूनही दिलासा मिळाला आहे. वेळेला ‘दत्त’ उभा राहिला आणि केबानी कुटुंबाला खऱ्या अर्थाने ‘आनंद’ परत मिळाला. मदतीसाठी पुढे सरसावलेल्या दत्ता’चे लोकांकडून कौतुक होत आहे.




















