मुंबई, दि. ८ : अजय मगरे
राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली असून, उर्वरित रक्कम शासन परतावा म्हणून देते. याच धर्तीवर दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देण्यात यावी, अशी मागणी ‘पत्रकार रुग्णमित्र’ दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसेच मुंबई मेट्रो प्रशासनाकडे केली आहे.
कैतके यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मेट्रो स्थानकांमध्ये व गाड्यांमध्ये अद्याप पूर्णपणे दिव्यांग अनुकूल सुविधा नाहीत. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांना प्रवासासाठी इतर व्यक्तींच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना प्रवासात संपूर्ण सवलत देणे हे सामाजिक न्याय आणि मानवी दायित्वाचे प्रतीक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
राज्य शासनाने महिला प्रवाशांसाठी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच, शासनाने परतावा स्वरूपात मेट्रो प्रशासनाला आर्थिक मदत देऊन दिव्यांग प्रवाशांना ही सवलत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. “ही सवलत ही दानधर्म नव्हे, तर त्यांच्या सन्मानाची ओळख ठरावी,” असे कैतके यांनी स्पष्ट केले.
दिव्यांग प्रवाशांना प्रवासात सुलभता आणि सन्मान मिळावा, यासाठी कैतके यांनी यापूर्वीपासूनच शासनस्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या या उपक्रमाला सामाजिक संस्थांकडून आणि जनतेकडूनही मोठा पाठिंबा मिळत असून, शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.




















