कोपरगाव, दि.१५ ( दिलीप गायकवाड )
महाराष्ट्रात महायुती सरकारच्या कारभारामुळे राज्य आणि देश दोन्ही ठिकाणी सर्व क्षेत्रांत भरीव प्रगती होत असून, महिलांसाठी समाजकारण व राजकारणात मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होत असल्याचे मत शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या की, “शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रवादी विचारसरणीला अनुसरून महिलांना राजकारणात व समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळत आहे. शिवसेना नेत्या नीलम गोरे, मीनाताई कांबळी, तसेच प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचे सातत्याने मार्गदर्शन महिलांना प्रेरणादायी ठरत आहे.”
महायुती शासन काळात संरक्षण, शिक्षण, कृषी, विज्ञान आणि अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “भारतातील अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी असून, संरक्षण क्षेत्रात आपली आघाडी संपूर्ण जगाने पाहिली आहे. महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीच्या दिशेने अग्रभागी आहे,” असेही त्यांनी सांगितले.
महिलांसाठी शासनाच्या विविध लोकाभिमुख योजनांमुळे त्यांचा सहभाग वाढला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महिलांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “घराणेशाहीला थारा नसलेल्या शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्यांनाही पुढे येण्याची संधी मिळते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
समाजकारणाची आवड असणाऱ्या आणि चांगली प्रतिमा असलेल्या महिलांनी शिवसेना महिला आघाडीत सक्रिय व्हावे, असे आवाहनही पुंडे यांनी यावेळी केले.



















