फेसबुक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…
मुंबई, दि.१८ : मंगेश म्हात्रे
‘मुळशी पॅटर्न’मधून घराघरात पोहोचलेले आणि मनसेचे सक्रिय शाखाप्रमुख म्हणून ओळखले जाणारे अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्या फेसबुकवरील एका पोस्टमुळे मनसे आणि आरएसएस दोन्ही संघटनांमध्ये नव्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
परदेशी यांनी आज सकाळी ‘जय हिंद जय महाराष्ट्र’ असे शीर्षक देत आरएसएसच्या कार्यक्रमातील आपला फोटो फेसबुकवर शेअर केला. पोस्टमध्ये त्यांनी “राष्ट्रप्रथम” असा ठळक उल्लेख करत “मी माझ्या विचारांसोबत आहे” असे लिहिले आहे. या विधानाने त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत नवे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
राज ठाकरेंचे खडेबोल अजूनही चर्चेत…!
काही दिवसांपूर्वीही परदेशी यांनी आरएसएसच्या कार्यक्रमातील आपला फोटो शेअर केला होता. त्या पोस्टनंतर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका बैठकीत परदेशींना उद्देशून “कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठेतरी राहा!” असे खडेबोल सुनावले होते. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केलेला हा रोखठोक राग मनसेच्या अंतर्गत घडामोडींना दिशा देणारा ठरल्याची चर्चा त्यावेळी होती.
मनसेतील हालचालींना गती
आज पुन्हा एकदा संघाच्या विचारांचा उल्लेख करत शेअर केलेल्या पोस्टमुळे परदेशी मनसेत राहणार की पक्षाची साथ सोडणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मागील काही दिवसांपासूनच ते मनसेच्या भूमिकांपासून लांब जात असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता त्यांच्या या नव्या फेसबुक पोस्टमुळे त्या चर्चेला अधिक जोर मिळाला आहे.
रमेश परदेशी खरोखरच मनसेला सोडचिठ्ठी देतात की पुन्हा एकदा पक्षाशी नाते दृढ करतात, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, त्यांच्या एका पोस्टनेही पुण्यातील राजकीय वातावरण तापवल्याचे निश्चित.




















