मुंबई, दि. ११ : मंगेश म्हात्रे
गृहनिर्माणासोबतच व्यापारी गाळ्यांच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी म्हाडा कोकण मंडळाने पाऊल उचलले आहे. कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे विरार बोळींज (जि. पालघर) व चितळसर मानपाडा (जि. ठाणे) येथील गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील ७१ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रियेला आजपासून प्रारंभ झाला आहे.
‘गो-लाईव्ह’ कार्यक्रमांतर्गत या उपक्रमाचे उद्घाटन म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्या हस्ते झाले. या लिलावात विरार बोळींज येथील ४४ गाळे व चितळसर मानपाडा येथील २७ गाळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑनलाईन अर्ज व नोंदणी – ११ सप्टेंबर दुपारी १२.०० पासून २६ सप्टेंबर रात्री ११.५९ वाजेपर्यंत
कागदपत्र पडताळणी – २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान
अनामत रक्कम भरणा – ८ ऑक्टोबर सकाळी ११.०० पासून १० ऑक्टोबर संध्याकाळी ५.०० पर्यंत ई-लिलाव प्रक्रिया – १३ ऑक्टोबर, सकाळी ११.०० पासून(www.eauction.mhada.gov.in वर) निकाल जाहीर – १४ ऑक्टोबर सकाळी ११.००(www.eauction.mhada.gov.in व www.mhada.gov.in
वर)
लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रातील सन २०१८ नंतरचे अधिवास प्रमाणपत्र व विहित अनामत रक्कम सादर करणे बंधनकारक आहे.
कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले की, “लिलावाबाबतची सर्व माहिती, पात्रता निकष, गाळ्यांची तपशीलवार यादी, सामाजिक आरक्षण, अर्ज प्रक्रिया व अटी शर्ती www.eauction.mhada.gov.in व www.mhada.gov.in
या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. इच्छुकांनी माहिती पुस्तिका नीट वाचूनच अर्ज सादर करावा.”




















