म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील भरती, बढती, आरक्षण व योजनांवर चर्चा
मुंबई, दि. ११ : अजय मगरे
विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या वतीने मुंबई उपनगरातील विविध शासकीय कार्यालयांना भेट देऊन कार्यालयीन कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. या दौऱ्याचा एक भाग म्हणून समितीने आज महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (म्हाडा) तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांची म्हाडा कार्यालयात बैठक घेऊन अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांच्या भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि जात पडताळणी यांसह राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला.

या बैठकीस समिती प्रमुख तथा विधानसभा सदस्य दौलत दरोडा, सुनिल शिंदे यांच्या समवेत अनेक विधानसभा सदस्य उपस्थित होते.
बैठकीदरम्यान झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, सचिव डॉ. दादाराव दातकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, तसेच मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरिकर उपस्थित होते.
समितीने संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध योजनांच्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेत सुधारणा करण्याच्या सूचनाही दिल्या. अनुसूचित जमाती प्रवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशासकीय पदांवर अधिक प्रतिनिधित्व मिळावे, तसेच आरक्षण आणि जात पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता राहावी, यावर समितीने भर दिला.




















