सायन-प्रतीक्षा नगरच्या आरक्षणानंतर राजकीय गोलंदाजी फिरली वेगाने
मुंबई , दि.१५ : मंगेश म्हात्रे
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांच्या आरक्षण जाहीरनाम्यानंतर सर्वच पक्षांत उमेदवारीसाठी चढाओढ सुरू झाली आहे. सायन प्रतीक्षा नगरचा प्रभाग क्र. १७३ महिलांसाठी राखीव झाला आहे. भाजपा आणि शिवसेना (ठाकरे) गटाने निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील हालचालींनाही वेग आला आहे. अशात सायन-कोळीवाडा विधानसभा संघटक दशरथ पवार यांच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय ?
गेल्या ३५ वर्षांपासून शिवसेनेत निष्ठेने कार्यरत असूनही कधीच उमेदवारीची अपेक्षा केली नाही, अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट शब्दांत नोंदवली आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय—
“निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळत नाही, वशीला-पैसा-ओळख यांनाच महत्त्व दिलं जात असल्याचं वर्षानुवर्षे पाहत आलो. आंदोलने, पोलीस केस, संकटे सहन केली, तरीही पक्षासाठी काम थांबवलं नाही.”
शिंदे गटात उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र होत असताना स्थानिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना मागे टाकून पक्षात सक्रिय नसलेल्या महिलांना उमेदवारी देणे हा अन्याय असल्याचा ठसठशीत उल्लेख पवार यांच्या पोस्टमध्ये आढळतो.
माजी नगरसेवक रामदास कांबळे शिंदे गटात प्रवेशल्यानंतर त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केल्याचा उल्लेखही पवार यांनी केला आहे.
प्रभाग क्र. १७३ आरक्षणात खुला राहिला असता त्यांनी ‘रामदास कांबळे यांनाच उमेदवारी ठेवली होती’, असे ते म्हणतात. मात्र प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यानंतर आपल्या सुन निकिता पवार यांना उमेदवारी मिळावी अशी स्पष्ट अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर दशरथ पवार यांनी “दंड थोपटल्याने” आणि फेसबुकवरून थेट नाराजी नोंदवल्याने शिंदे गटातील अंतर्गत समीकरणे बदलण्याची चिन्हे राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहेत.
आता पवार यांना पक्षातून कोणते संकेत मिळतात, उमेदवारीची दिशा कोणत्या बाजूला वळते आणि शिंदे गटात याचा पुढील परिणाम काय होतो… याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















