मुंबई,१७ ( अजय मगरे )
पैठण शहरातील विविध विकासकामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित ४०० घरांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या.
या बैठकीत माजी खासदार रावसाहेब दानवे, आमदार विलास गुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी अंभोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजना, स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे तसेच आपेगाव येथील मंदिर तीर्थक्षेत्र विकास निधीतील कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत.
तसेच, स्थानिक निधीतून घनकचरा व्यवस्थापनाची कामे तात्पुरत्या स्वरूपात बाह्य सेवेद्वारे करावीत. कचरा संकलन, झाडलोट, नालेसफाई, कचरा वाहतूक तसेच मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत मोठे नाले जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छ करण्यात यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. या कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री मिसाळ यांनी जिल्हावार्षिक योजनेंतर्गत दोन शॉपिंग कॉम्प्लेक्स, शिवाजी बालउद्यान आणि ६८ व्यावसायिक गाळ्यांची कामे देखील पूर्ण करण्याचे निर्देश दिले.




















