कोपरगावमध्ये काँग्रेस कार्यकर्ते मैदानात ; निवडणुकीसाठी जोरदार तयारी – नितीन शिंदे
कोपरगाव, दि. १९ ( दिलीप गायकवाड )
कोपरगाव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने जोरदार तयारी सुरू केली असून, आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास काँग्रेसचे कोपरगाव तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नितीन शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

एका विशेष मुलाखतीत शिंदे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मा. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार आणि इतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार संपूर्ण निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. कोपरगाव नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती यासह सर्वच निवडणुकांमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचा इतिहास समृद्ध आहे. राहुल गांधी यांचे कार्य व विचार हे युवकांना प्रेरणा देणारे ठरत आहेत. काँग्रेसने ग्रामीण भागात विकासाच्या अनेक योजना राबवल्या, गरिबांसाठी घरे, रोजगार, तसेच शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जनतेचा विश्वास काँग्रेसवर पुन्हा बसत आहे.”
राज्यातील महाविकास आघाडीबाबत विचारले असता, शिंदे म्हणाले की “वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयावर आमची भूमिका ठरेल आणि आम्ही त्यानुसार कार्य करू.”
कोपरगावमध्ये काँग्रेसचा पायाच भक्कम….शिंदे यांनी नमूद केलं की, “पूर्वीच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जनतेने दिलेला विश्वास आणि पाठिंबा आता नगरपरिषद निवडणुकीतही दिसेल. काँग्रेस कार्यकर्ते आता पूर्ण क्षमतेने प्रचारात गुंतले आहेत.”
प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि जोशात कार्यकर्ते,या निवडणूक तयारीत पुढील प्रमुख नेते आणि पदाधिकारी सक्रिय सहभागी झाले आहेत –
हर्षवर्धन सपकाळ (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष), जयंत वाघ (अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष), विजय जाधव (किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष), ॲड. शितलताई देशमुख (महिला शहराध्यक्ष), सौ. पुष्पाताई भंगत (तालुका अध्यक्षा), तुषार पोटे (शहराध्यक्ष), तसेच सौ. शुंभागी शुभम जाधव, सचिन होन, सोमनाथ पगारे, चंदू जगताप, विलास जाधव, शब्बीर शेख, विष्णु वाडेकर, मझार शेख आणि इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.
या सर्वांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेतल्याने काँग्रेसचा जनसंपर्क अधिक प्रभावी होत असून, कोपरगावमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.




















