ठाणे, दि. २३ ( अजय मगरे )
ठाण्यातील कैलास नगर, आयटीआय सर्कल परिसरात रविवारी संध्याकाळी अंदाजे १० फूट लांबीचा भला मोठा भारतीय अजगर (Indian Rock Python) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच पुनर्वसु फाउंडेशनच्या सर्पमित्रांनी अत्यंत धाडसाने आणि दक्षतेने या अजगराला सुरक्षितरीत्या पकडले.
सर्पमित्र अतिथ यांना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास कैलास नगर येथील काही स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून सापाचे निदर्शनास आल्याचे सांगितले. तत्काळ सर्पमित्र अतिथ आणि त्यांचे सहकारी तुषार चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली हा अजगर लपलेला आढळून आला.
बचावकार्य सुरू करताना अजगराचा फुत्कार स्पष्ट ऐकू येत होता, त्यामुळे स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. मात्र, अतिथ आणि तुषार यांनी प्रसंगावधान राखून, अत्यंत संयमाने आणि प्रशिक्षित पद्धतीने सापाला सुरक्षितरीत्या पकडले. नागरिकांच्या कौतुकास्पद प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळाल्या.
साप पकडल्यानंतर सर्पमित्रांनी नागरिकांना सर्पाविषयी जनजागृती करत त्यांच्या मनातील भीती दूर केली. या कारवाईमुळे पुनर्वसु फाउंडेशनच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
यानंतर वन विभागाचे परिमंडळ अधिकारी रमाकांत मोरे, वनरक्षक बाळू सुभाष शेडके यांच्या उपस्थितीत आणि फाउंडेशनचे सदस्य रवी, मंगेश, पूजा यांच्या मदतीने अजगराला कोणतीही इजा न करता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.




















