मुंबई,दि.१८ ( मंगेश म्हात्रे )
मुंबईच्या नागरी वाहतूक व्यवस्थेत क्रांती घडवणाऱ्या धारावी मल्टी-मोडल ट्रांझिट हब च्या विकासाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडे सोपवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १८ जून २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एमएमआरडीए ला या प्रकल्पासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे एमएमआरडीए आता मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ, मध्य-पश्चिम रेल्वे, बेस्ट आदी प्रमुख वाहतूक संस्थांशी समन्वय साधून, रेल्वे, मेट्रो, विमानतळ व बस सेवा यामध्ये सुसंगतता साधण्याचे काम करणार आहे.
महिम, सायन, चुनाभट्टी स्थानकांसोबत उपनगरी रेल्वेची जोडणी मेट्रो लाईन २बी, ३,८ आणि ११ यांच्याशी थेट संपर्क
बीकेसी बुलेट ट्रेन स्थानक, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळांशी सहज पोहोच.
बीकेसी पर्सनल रॅपिड ट्रांझिट नेटवर्कचा विस्तार धारावीपर्यंत
२४x७ चालणारे शहरी केंद्र – शॉपिंग, हॉटेल्स, ऑफिसेस, कन्वेन्शन सेंटर्स, कॅफे
या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात, एमएमआरडीए एक व्यावसायिक संस्था नियुक्त करणार असून, ती धारावी मल्टी-मोडल ट्रांझिटहब चा सविस्तर शास्त्रीय अभ्यास व संरचनात्मक आराखडा तयार करेल. संबंधित प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले,“धारावी मल्टी-मोडल ट्रांझिट हब ही केवळ वाहतूक सुसंगतीची योजना नसून, समावेशक नागरी परिवर्तनाचे दूरदर्शी स्वप्न आहे. नागरिक, सेवा आणि संधी यांना जोडणारे शाश्वत केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे. अभ्यासानंतर आम्ही सर्व वाहतूक साधनांची जोड साधणारा व्यापक आराखडा सादर करू.”
धारावी वाहतूक हब हे प्रकल्प मुंबईच्या शहरी पुनरुज्जीवन, वाहतूक सुधारणा व आर्थिक विकासाचे केंद्र ठरणार आहे. जागतिक दर्जाची आणि एकमेकांशी जोडलेली महानगर घडवण्याच्या दिशेने एमएमआरडीए’ चे हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.




















