मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली २७ तक्रारींवर सुनावणी…
मुंबई, दि.२६ ( मंगेश म्हात्रे )
नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे आज दुसऱ्या जनता दरबार दिनाचे आयोजन करण्यात आले. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमात एकूण २७ तक्रारींवर सुनावणी झाली.
या सुनावणीस मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर अध्यक्षस्थानी होते.तर सह मुख्याधिकारी उमेश वाघ उपस्थित होते. यांनी सर्व अर्जदारांच्या तक्रारी सहानुभूतीपूर्वक ऐकून घेत, त्यांचे त्वरीत निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस निर्देश दिले.यात इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत मूळ भाडेकरूंना डावलणे, विकासकाकडून वेळेवर भाडे न मिळणे, पुनर्विकासासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्राची विलंबित प्रक्रिया, वारसांच्या नावे दस्तऐवज नसणे, सर्वेक्षण प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी या मुद्द्यांचा समावेश होता.
या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शंभरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीसाठी निर्देश दिले असून, नागरिकांच्या प्रश्नांचे प्रभावी निवारण करण्याच्या म्हाडाच्या वचनबद्धतेची प्रचिती या उपक्रमातून पुन्हा एकदा मिळाली आहे.




















