आपल्या हक्कासाठी झोपडीधारकांचा मोठा सहभाग; प्रशासन समाधानात
मुंबई, दि.६ (प्रतिनिधी)
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) बृहन्मुंबई यांच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या एक वेळची अभय योजना अंतर्गत शहरभर झोपडीधारकांच्या अर्जांची छाननी करण्यासाठी आयोजित शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला. एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम प्राधिकारी १ ते १० यांच्या कार्यक्षेत्रात ही शिबिरे नुकतीच पार पडली.
मुंबईच्या विविध भागांत भरवण्यात आलेल्या या शिबिरांमध्ये आपल्या झोपडीचा हक्क अबाधित राहावा यासाठी हजारो झोपडीधारकांनी गर्दी केली. आवश्यक पुरावे व कागदपत्रे सादर करत त्यांनी प्रशासनाचा विश्वास संपादन केला. “योजनेत सहभागी होण्यासाठी झोपडीधारकांनी दाखवलेली जागरूकता आणि शिस्त पाहता आम्हाला समाधान वाटते,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
छाननी प्रक्रियेनंतर पात्र ठरणाऱ्या झोपडीधारकांना अभय योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सदर योजना आणि शिबिरांविषयी अधिक माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच सक्षम प्राधिकाऱ्यांच्या कार्यालयांतून मिळू शकते.




















