कोपरगाव, दि ९. ( दीपक ससोटे )
कोपरगांव तालुक्यातील टाकळी गावाकडे जाणारा जुना टाकळी रस्ता गेली कित्येक वर्षे दयनीय अवस्थेत असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी किसान काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केली असून, वेळेत दुरुस्ती न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जुना टाकळी रस्ता कोपरगांव शहरातील निवारा कॉर्नरपासून टाकळी गावापर्यंत जातो. कोपरगांव बस डेपोची कोपरगांव–मुखेड–हडेवाडी ही बस याच मार्गावरून धावत होती, मात्र रस्त्याची खडखडीत झालेली अवस्था आणि अतिक्रमणामुळे ही बससेवा बंद करण्यात आली आहे. रस्त्यावरील खड्डे,खराब पायाभूत सुविधा आणि दोन्ही बाजूंनी वाढलेली अतिक्रमणे यामुळे नागरिकांचा प्रवास अत्यंत धोकादायक झाला आहे.
ग्रामीण कोपरगांव–मूर्शतपूर ग्रामपंचायत व टाकळी ग्रामपंचायत हद्दीतला हा रस्ता जिल्हा परिषद व पंचायत समितीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला असला तरी अद्याप दुरुस्तीच्या दृष्टीने कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
निवारा कॉर्नर परिसरातील अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ता मोकळा करावा, तसेच या मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी विजय जाधव यांनी केली आहे. अन्यथा नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.




















