शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी
मुंबई, दि. २५ : अजय मगरे
१३ ते २२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ७५५ गावांना फटका बसला असून ३ लाख २३ हजार १९६ शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीप हंगामावर या पावसाचा सर्वाधिक परिणाम झाला असून २ लाख २९ हजार ९७ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं आहे. मात्र शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. राज्य शासन सातत्याने मदतीसाठी पुढाकार घेत आहे,” अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली.

कृषिमंत्री भरणे यांनी आज शेवगाव तालुक्यातील भगुर आणि पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावांची पाहणी करून शेतकऱ्यांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली. पावसामुळे ओसंडून वाहणारे धरणे, पूरग्रस्त नद्या आणि पाण्याखाली गेलेली शेती यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी आपली व्यथा थेट मंत्र्यांसमोर मांडली. या वेळी महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार, तलाठी आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले, “पाथर्डी तालुक्यातील ९ पैकी ८ मंडलांत अतिवृष्टी झाली असून टाकळी व खरवंडी या दोन मंडळात तब्बल १५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. एकूण ७७ हजार १५५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं असून १ लाखाहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. पूरामुळे पूल व रस्ते वाहून गेले, घरं-शेती पाण्याखाली गेली, मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्तांना मदत दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. “अहिल्यानगरमध्ये ऑगस्ट महिन्यातील ७१ हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं असून १४० शेतकऱ्यांना ६ लाख ३० हजारांची मदत वितरित केली आहे. आता सप्टेंबर महिन्यातील पंचनामे जलदगतीने पूर्ण करून मदत देण्यात येईल,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
अहिल्यानगर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत एकूण २ लाख ९९ हजार ८१८ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. तर राज्याचा विचार करता ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, भाजीपाला, फळपिके अशी अनेक पिकं या आपत्तीमुळे बाधित झाली आहेत.
राज्याचा विचार करता, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७ एकर बाधित क्षेत्र आहे. या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं असून प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, फळपिके, मका, इत्यादी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर, पारनेर, पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, शेगाव, संगमनेर, अकोले, कोपरगाव आणि राहाता या तालुक्यांचं मोठं नुकसान झालं आहे.




















