दुकानदारांना स्थलांतराचा सल्ला
कोपरगाव, दि. २८ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या माता जगदंबा देवीच्या (जुनी गंगा देवी) मंदिर परिसरात शनिवारी (दि. २७) संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या जुन्या पात्राला पूर आला. या अनपेक्षित पाणीप्रवाहामुळे मंदिर परिसरात नवरात्रोत्सव व दसऱ्यानिमित्त उभारलेली दुकाने पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला.
धोका लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापकांनी व्यापाऱ्यांना तत्काळ साहित्य काढून घेण्यास सांगितले. पावसाचा जोर कायम राहिल्याने संपूर्ण कोपरगाव परिसरातही पाणी साचले आहे.
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रामपंचायत जेऊर कुंभारीचे सरपंच, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच काही सेवाभावी संस्था सतत लक्ष ठेवून मदत कार्यात गुंतल्या आहेत.




















