मुंबई दि. २९ : मंगेश म्हात्रे
राज्यातील नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपुनर्विकासाला चालना मिळावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे सदस्य प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना मंत्रीपदाचा दर्जाही देण्यात आला आहे.
गृहनिर्माण विभागाच्या आज (२९ सप्टेंबर) काढलेल्या शासन निर्णयानुसार, नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सवलतींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांच्या मान्यतेनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने जुलै महिन्यात सरकारकडे अहवाल सादर केला होता. त्यात स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन देण्यासह धोरणात्मक उपाय सुचवण्यात आले होते. या शिफारशींना सरकारने मान्यता देत स्वतंत्र प्राधिकरण उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
शासन निर्णयानुसार स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांना मंत्रीपदाच्या दर्जाच्या सर्व सुविधा म्हाडा प्राधिकरणाकडून देण्यात येतील,राज्यातील गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी म्हाडा ही समन्वय संस्था (नोडल एजन्सी) म्हणून कार्य करेल.प्राधिकरणाच्या कामकाजासाठी स्वतंत्र कार्यालयीन जागा, कर्मचारी व आवश्यक प्रशासकीय सुविधा म्हाडा उपलब्ध करून देईल.




















