कोपरगाव : दि. २ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील मौजे कोकमठाण येथील तीनचारी भागात उभारण्यात आलेल्या इंडस टॉवर कंपनी लिमिटेडच्या मोबाईल टॉवरविषयी ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. टॉवरवरील लाईट कनेक्शनच्या उघड्या वायरमुळे ग्रामस्थांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून काही लहानमोठ्या दुर्घटनाही घडल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी झालेल्या ग्रामसभेत इंडस टॉवर कंपनीला नोटीस देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामपंचायतीकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसीत टॉवरच्या विद्युत वाहक तारा तातडीने अंडरग्राऊंड करण्याचा किंवा टॉवरचे स्थलांतर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांनी कंपनी व्यवस्थापकांना तातडीने कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालयात चर्चेसाठी येण्यास कळविले आहे. अन्यथा, ग्रामस्थांच्या सुरक्षेचा विचार करून टॉवरला पूर्वी देण्यात आलेली एनओसी रद्द करून टॉवर हटविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यकर्ते गोकुळ नेहे यांनी ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे स्वागत करत “ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारा निर्णयावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे अशी माहिती गोकुळ नेहे यांनी बहुजन शक्ती न्यूजला दिली.




















