डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन अधिक सुसंगत व्हावे;
चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सुविधा वाढवा – मुख्य सचिव राजेश कुमार
मुंबई, दि.१२ : अजय मगरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी सर्व विभागांनी समन्वयाने सूक्ष्म नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात आवश्यक सुविधा पुरविण्याबाबत मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर विभागीय आयुक्त कोकण सिद्धराम सालीमठ, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, नगरविकास विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या, तसेच महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले की, “चैत्यभूमी परिसरात मंडप व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, भोजन व आरोग्य सुविधा, तसेच स्वच्छता यावर विशेष भर द्यावा. दादर परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, तसेच अनुयायांना मार्गदर्शन मिळावे म्हणून सूचना फलकांची व्यवस्था करावी,” असे निर्देश त्यांनी दिले.
बैठकीत भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा, सुरक्षाव्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालये, परिसर स्वच्छता, सीसीटीव्ही, विद्युतपुरवठा, पुस्तकांचे स्टॉल तसेच शासकीय जाहिरात आणि प्रसिध्दी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
राज्य शासनाने यंदा महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन अधिक सुसंगत व सुव्यवस्थित करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करून अनुयायांच्या सोयीसुविधांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.




















