दर्जेदार विकासकामांनी नाशिक होणार सुंदर आणि आधुनिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. १३ : अजय मगरे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे तब्बल ५ हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज ठक्कर मैदानावर करण्यात आले. या कामांमुळे नाशिकचे रुप पालटणार असून, दर्जेदार आणि पारदर्शक विकासकामांद्वारे नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, शोभा बच्छाव, तसेच मुख्य सचिव राजेश कुमार, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रविण गेडाम, आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “मागील कुंभमेळ्याचे आयोजन उत्कृष्ट झाले होते. मात्र, या वेळी पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्था, सुरक्षा, पर्वस्नानाचे नियोजन आणि अध्यात्मिक अनुभव देणे हे मोठे आव्हान आहे.”
त्यांनी सांगितले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून २० हजार कोटींहून अधिक कामे सुरू आहेत, आणि कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम २५ हजार कोटींवर पोहोचेल. “या विकासकामांमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होतील,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “कुंभमेळ्यासाठी रस्ते व महामार्ग दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची योजना, गोदावरीचे पावित्र्य राखणे, घाटांची निर्मिती, जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन अशा विविध कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या सर्व कामांमुळे नाशिक पर्यटनक्षेत्र म्हणून पुढे जाईल. पुढील २५ वर्षे ही कामे नाशिकच्या विकासाचा पाया ठरतील.”
कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन सुकर व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग, नवीन विमानतळ टर्मिनल इमारत, रेल्वे व बसस्थानक सुविधा, तसेच स्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“विकासकामे करताना नागरिकांचे नुकसान होणार नाही, मात्र नागरिकांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन करत मुख्यमंत्री म्हणाले, “साधूसंतांचे मार्गदर्शन हे कुंभमेळ्याच्या यशाचे सूत्र आहे. शासनाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.”




















