कोपरगाव, दि. १६ : दिलीप गायकवाड
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपरिषदेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. सौ. सपना भरत मोरे यांना अधिकृत उमेदवारी देत ए.बी. फॉर्म प्रदान करण्यात आला. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय औपचारिकरित्या जाहीर झाला.
यावेळी शहर व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्साहाने घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. सौ. मोरे यांच्या नावावर कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त करत “सपना मोरे निश्चित विजयी होतील” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
पक्षाच्या धोरणांनुसार नागरिकांचे प्रश्न सोडविणे, पारदर्शक कारभार आणि विकासकामांना प्राधान्य देत निवडणूक लढविण्याची भूमिका बैठकीत स्पष्ट करण्यात आली.




















