ट्रान्झिट रेंटच्या तक्रारींवर आता झटपट कारवाई
मुंबई -मंगेश म्हात्रे
म्हाडाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू आणि रहिवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेत डिजिटल तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली सुरू केली आहे. ट्रान्झिट रेंट, पुनर्वसन, सदनिकांचा ताबा आणि विकासकांशी संबंधित विविध तक्रारी आता ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येणार असून त्यावर कालमर्यादेत कारवाई केली जाणार आहे.
दादर पूर्व येथील मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या विभागीय कार्यालयात या प्रणालीचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ही डिजिटल प्रणाली तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहे. विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली ३३(७) अंतर्गत सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमधील ट्रान्झिट रेंट तक्रारींसाठी कठोर आणि वेळबद्ध यंत्रणा उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
या नव्या प्रणालीमुळे रहिवाशांना घरबसल्या तक्रार नोंदवता येणार असून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रार दाखल होताच संबंधित अधिकाऱ्यांना एसएमएस आणि ई-मेलद्वारे तत्काळ सूचना मिळणार आहेत. तसेच अर्जाची सद्यस्थितीही ऑनलाइन पाहता येणार आहे.
म्हाडाच्या माहितीनुसार, उपअभियंते तक्रारींची पडताळणी करून सुनावणीच्या तारखा निश्चित करतील, तर उपमुख्य अभियंते संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवतील. विकासकांनाही त्यांच्या प्रकरणांबाबत माहिती पाहण्याची आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, “तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि प्रभावी सेवा देणे हेच या उपक्रमामागचे मुख्य उद्दिष्ट आहे. प्रत्येक तक्रारीचे वेळेत निवारण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
म्हाडाने ही प्रणाली आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली असून प्रत्येक तक्रारीवर निश्चित कालमर्यादेत कार्यवाही केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.




















