मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन – मनोज निलक
कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांचा संयम अखेर संपला असून, घरांचे स्वतंत्र उतारे आणि जागेचे स्वतंत्र मोजमाप नकाशे (लेआऊट) तातडीने उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज निलक यांनी दिला आहे.

निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी २० मे २०२० रोजी रद्द करण्यात आली. त्यापूर्वी २० सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत संस्थेचे संचालक मंडळ, सचिव आणि अवसायक यांनी २७३ सभासदांना प्रत्येक घराचा स्वतंत्र उतारा व जागेचा स्वतंत्र लेआऊट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र संस्था बरखास्त होऊन आठ वर्षांचा कालावधी उलटूनही हे आश्वासन हवेतच विरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
सध्या नागरिकांना केवळ सामाईक जागेचे उतारे देण्यात आले आहेत. मात्र प्रत्येक घराचा स्वतंत्र उतारा आणि संबंधित जागेचा मोजमाप नकाशा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ घेण्यास अडथळे निर्माण होत असून, बँकांकडून गृहकर्ज मिळवितानाही नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निलक यांनी सांगितले.
१९८३ पासून सभासदांकडून विविध कारणांसाठी पैसे गोळा करण्यात आले. पुनर्वसनासाठी राखीव जागा, खुली मैदाने आणि संस्थेच्या मालमत्तेबाबतची माहितीही नागरिकांपासून दडविण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
यासंदर्भात शासन आणि प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. नगरपरिषद निवडणुकीत लोकप्रतिनिधींनी प्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली; मात्र सत्तेत आल्यानंतर त्याचा विसर पडल्याची टीका मनोज निलक यांनी केली.
“नागरिकांना त्यांच्या हक्काचे स्वतंत्र उतारे आणि लेआऊट तातडीने मिळाले नाहीत, तर निवारा वसाहतीतील रहिवाशांसह धरणे आंदोलन उभारण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,” असा निर्वाणीचा इशाराही मनोज निलक यांनी दिला.

















