कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचार प्रकरण:
१५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आत्मदहन करणार – विजय जाधव
कोपरगांव दि.५ ( दिलीप गायकवाड )
काँग्रेसचे नेते विजय जाधव यांनी कोपरगांव कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराचा आरोप करत यासंदर्भातील संपूर्ण पत्रव्यवहार निंबधकाकडे सादर केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी १ मे, कामगार दिनानिमित्त आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

मात्र, प्रशासनाने कारवाईचे आदेश काढल्याचे पत्राने कळविल्यानंतर आणि अधिकाऱ्यांच्या आश्वासनाच्या अनुषंगाने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. असून विजय जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर आगामी १५ दिवसांत सरकारने या प्रकरणी ठोस कार्यवाही केली नाही, तर आत्मदहन आंदोलन पुन्हा करण्यात जाईल.
या प्रकरणी जाधव यांनी २९ एप्रिल रोजी कोपरगांवचे सहायक निबंधक (सहकारी संस्था) नामदेव ठोंबळ यांची भेट घेतली. यावेळी ठोंबळ यांनी सांगितले की, “संबंधित अहवाल प्राप्त होताच कार्यवाही केली जाईल.” यावर जाधव यांनी प्रतिपादन केले की, “भ्रष्टाचाराच्या काळात नामदेव ठोंबळ हेच बाजार समितीचे प्रशासक होते, मग आता ते कोणत्या अहवालाची वाट पाहत आहेत?”
आज विजय जाधव यांनी आत्मदहन आंदोलन स्थगिती पत्राच्या आधारे पुन्हा एकदा सरकारला १५ दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतरही कार्यवाही न झाल्यास आत्मदहन आंदोलन अटळ असल्याचा पुनरुच्चार केला आहे.



















