महाराष्ट्रात ‘क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचे आयोजन – पारंपरिक खेळांना प्रोत्साहन
मुंबई, दि. २ ( अजय मगरे )
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्रात ‘क्रीडा महाकुंभ’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचा प्रारंभ होत आहे.
२ ते ९ मार्चदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत कबड्डी, खो-खो, लगोरी, लेझिम, लंगडी, विटी-दांडू यांसह एकूण १२ पारंपरिक खेळांचा समावेश आहे. स्पर्धेचे आयोजन आयटीआय स्तरावर २ आणि ३ मार्चला, जिल्हास्तरावर ४ आणि ५ मार्चला, तर नाशिक विभागीय स्तरावर ७ ते ९ मार्चदरम्यान करण्यात आले.
आहे. विजेत्यांसाठी आकर्षक पारितोषिके असून सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंना क्यूआर कोड स्कॅन करून किंवा संबंधित आयटीआयच्या प्रभारी अथवा मुख्याध्यापकांमार्फत नोंदणी करावी लागेल. प्रवेश शुल्क केवळ १० रुपये असून, ते स्पर्धकांना परत दिले जाणार आहे.
“गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ, जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेल्या या क्रीडा महाकुंभाचा उद्देश पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे आणि नव्या पिढीला शिवकालीन इतिहासाची ओळख करून देणे हा आहे. विशेषतः पावनखिंड दौड या ऐतिहासिक संदर्भ असलेल्या खेळाचाही यात समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धेचे आयोजन कौशल्य विकास विभागाच्या व्यवसाय प्रशिक्षण व संचालनालयाच्या सहकार्याने आणि पुणे येथील ‘क्रीडा भारती’ संस्थेच्या सहयोगाने करण्यात आले आहे. या अनोख्या उपक्रमात युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ जागतिक स्तरावर पोहोचवावेत, असे आवाहन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.




















