बेपत्ता प्रकरणाचा शेवट सुखरूप; कोल्हापुरात दोन्ही मुली सापडल्या
मुंबई : मंगेश म्हात्रे
सायन प्रतीक्षानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलींबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. (वय 12 वर्षे) आणि (वय 14 वर्षे) असलेल्या या दोन्ही मुली सुखरूप असून सध्या रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून या दोन्ही मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यात आली होती.
दरम्यान, 12 वर्ष वय असेलेल्या मुलीच्या वडिलांना रेल्वे पोलिसांकडून फोनद्वारे माहिती देण्यात आली की, दोन्ही मुली कोल्हापूर येथे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात आढळून आल्या आहेत. सध्या त्यांना नियमानुसार बाल सुधारगृहात ठेवण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि कुटुंबीयांनी मोठा दिलासा व्यक्त केला आहे. संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही मुली लवकरच सायन प्रतीक्षानगर येथे आपल्या घरी परततील, अशी माहिती देण्यात आली आहे.




















