जनजागृती रॅली, शपथविधी आणि व्याख्यानांतून नशामुक्त समाजाचा निर्धार…
ठाणे, दि. २६ ( अजय मगरे )
“जगाला अमली पदार्थमुक्त बनवण्यासाठी एक पाऊल” या ध्येयाने प्रेरित होऊन ठाणे शहरात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन विविध जनजागृती उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठाणे पोलीस आयुक्तालय, जिल्हा प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या दिनानिमित्ताने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सकाळी ठाणे रेल्वे स्टेशनपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी, पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “Say No To Drugs”, “माझं आयुष्य, माझा निर्णय – अमली पदार्थांना नकार” अशा जोरदार घोषणांनी ठाणे शहरात जनजागृतीचा संदेश दिला.
रॅलीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी नागरिक व विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचा वापर न करण्याची तसेच इतरांनाही प्रतिबंध करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमात ठाणे पोलीस उपायुक्त (गुन्हे) विनायक शिंदे यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर सखोल विवेचन केले. त्यांनी सांगितले की, “अमली पदार्थांचे विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी पोलिस प्रशासन सजग आहे. मात्र समाजातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने पुढाकार घेतला पाहिजे.”
कार्यक्रमात शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून अमली पदार्थ विरोधी जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे दिला.




















