कोपरगांव, दि.२४ (दीपक साटोटे)
तालुक्यातील साईबाबा कॉर्नरजवळील ब्राह्मणगाव ग्रामपंचायतअंतर्गत चालणाऱ्या एस.एस.सोसायटी पेट्रोल पंपाविषयी मॅनेजर कैलास शेळके यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदरचा पंप हा दिवस-रात्र सुरू असतो, मात्र काही सुरक्षेच्या कारणास्तव रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत सेवा बंद ठेवावी लागते.

मॅनेजर शेळके यांनी सांगितले की, “रात्रीच्या वेळेस केवळ कर्मचारीच उपस्थित असतात. या वेळेत मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या काही व्यक्तींकडून धमकावणे, शिवीगाळ व विनामूल्य इंधन घेऊन पळ काढण्याचे प्रकार घडत असतात.
पंपावर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असले तरी हे तोडबाज प्रकार रोखता येत नाहीत. यामुळेच अनेकदा आम्हाला सेवा बंद ठेवावी लागते.”
पुढे बोलताना शेळके म्हणाले, “कधीमधी रेती, वाळू वाहणारी वाहने रात्रीच्या वेळी येतात. त्यामधील चालकांकडूनही गैरवर्तन होते. पूर्वी पोलीस गस्त असायची, मात्र सध्या ती बंद आहे. त्यामुळे अशा घटना वाढत असून पंपाचे आर्थिक नुकसान होत आहे.”
ग्राहकांसाठी सीएनजी गॅसची सुविधा उपलब्ध नाही, तसेच डिजिटल पेमेंट व कार्ड पेमेंट सुविधा मात्र उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.
ग्रामीण व शहरी भागातून २४ तास सेवा मिळावी, अशी ग्राहकांची अपेक्षा असते. मात्र, सुरक्षेअभावी व्यवस्थापन अडचणीत येते. स्थानिक प्रशासनाने याबाबत लक्ष घालून सुरक्षेची योग्य व्यवस्था करून दिल्यास, पंप पूर्णवेळ सुरू ठेवता येईल, असे शेवटी शेळके यांनी स्पष्ट केले.




















