जालना, दि.२४ : अनंता मोटे
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर आणि अंबड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली.
सलग पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, जमिनी खरडून गेल्या आहेत तसेच विहिरींनाही बाधा झाली आहे. पाहणीदरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेत मंत्री भरणे यांनी अधिकाऱ्यांना थेट फोनवरून सूचना दिल्या.
“एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये. जमिनी, पिके, गुरं आणि विहिरींचेही पंचनामे करा. शेतकऱ्याला न्याय मिळणे ही शासनाची प्राथमिकता आहे,” असा ठाम इशारा कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
प्राथमिक अंदाजानुसार जालना जिल्ह्यात सुमारे २ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, राज्यभरात ३३ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.




















