महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार
मुंबई, दि. १५ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन आणि आयबीएम टेक्नॉलॉजी (इंडिया) यांच्यात मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून राज्यात तीन ठिकाणी – मुंबई, पुणे आणि नागपूर – कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कौशल्य व उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार झाला.
मुंबईत भौगोलिक विश्लेषणासाठी, पुण्यात न्यायवैद्यकीय विज्ञान क्षेत्रासाठी आणि नागपूरमध्ये प्रगत एआय संशोधन व MARVEL अंमलबजावणी तंत्रज्ञानासाठी ही केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
या उपक्रमाचा उद्देश शासकीय सेवा अधिक प्रभावी, गतिमान व नागरिकाभिमुख बनवणे आहे. या केंद्रांमधून कृत्रिम बुद्धिमत्ता, हायब्रिड क्लाऊड, डेटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा आणि ऑटोमेशन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात आमूलाग्र सुधारणा करण्यात येणार आहे.
या कराराच्या अंतर्गत विकसित होणाऱ्या एआय मॉडेल्सवर मालकी हक्क महाराष्ट्र शासनाकडे असणार असून, शासनाचे तंत्रज्ञानावर पूर्ण नियंत्रण राहणार आहे. जनरेटिव्ह एआयच्या वापरामुळे प्रशासकीय प्रक्रिया अधिक पारदर्शक, आधुनिक व अंदाजाधारित बनतील. नागरिकांसाठी ओळख व्यवस्थापन व सुरक्षित प्रवेश प्रणालीवरही विशेष भर दिला जाणार आहे.
शासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांना आयबीएमच्या प्रशिक्षण प्लॅटफॉर्मद्वारे AI, सायबर सुरक्षा व क्लाऊड तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, MSME व उद्योग क्षेत्राला AI व ऑटोमेशनच्या दिशेने प्रेरित करण्यात येणार आहे.
या सामंजस्य कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि आयबीएमचे व्यवस्थापकीय संचालक संदीप पटेल हे उपस्थित होते.



















