ठाणे, दि.१५ : अजय मगरे)
धर्मांतर घोषणेच्या ऐतिहासिक दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी हजारो अनुयायी मुक्तीभूमी येथे बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतात. यंदा या ऐतिहासिक भूमीवर ५६ फूट उंच पंचशील ध्वजस्तंभाचे लोकार्पण डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यामुळे मुक्तीभूमीचा परिसर “जयभीम” घोषणांनी दुमदुमून गेला.

या कार्यक्रमाचे आयोजन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या वतीने करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाखाध्यक्ष भाऊसाहेब जाधव होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. हरीश रावलीया (ट्रस्टी चेअरमन), ॲड. एस. के. भंडारे (ट्रस्टी व केंद्रीय कार्यालय प्रमुख), ॲड. डॉ. जगदीश गवई, यू. जी. बोराडे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), देवेंद्र उबाळे (ट्रस्टी, येवला मुक्तीभूमी), सुरेखा लोखंडे (अध्यक्ष,महिला शाखा) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने समता सैनिक दल, श्रामनेर भिक्खू संघ आणि कार्यकर्त्यांनी शहरातून भव्य रॅली काढली. त्यानंतर मुक्तीभूमीवरील विपश्यना हॉलमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ५६ फूट उंच धम्मध्वज व समता सैनिक दलाच्या ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. सूत्रसंचालन ॲड. एस. के. भंडारे, राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड आणि शरद भोगे यांनी केले.
या सोहळ्याचा एक भाग म्हणून समता सैनिक दलाच्या कबड्डी, लाठीकाठी आणि धावण्याच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. कार्यक्रमादरम्यान बोलताना ॲड. एस. के. भंडारे म्हणाले, “ज्या नाशिककरांनी सुमारे ६.२५ लाख रुपये खर्चून हा पंचशील ध्वज उभारला, त्यांचे अभिनंदन. आता येवला मुक्तीभूमीला ॲड. बाळासाहेब आंबेडकर व डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या संकल्पनेतून नंदनवन बनवण्याची जबाबदारी सर्व अनुयायांनी घ्यावी.”
या वेळी बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघाचे बापू सादवे, मोहन जमदाडे यांचा तसेच एका मुस्लिम कुटुंबाचा बौद्ध धर्म स्वीकारल्याबद्दल डॉ. आंबेडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या ऐतिहासिक दिवसानिमित्ताने ७० बौद्धांच्या श्रामनेर शिबिराचा समारोप करण्यात आला. चित्यभूमीचे भंते बी. सुमेध बोधी आणि एम. डी. सरोदे गुरुजी यांनी प्रशिक्षण दिले.
समता सैनिक दलाच्या संचालनात डी. एम. आचार्य, दादासाहेब भोसले, मोहन सावंत, चंदा कासले, पी. एस. ढोबळे, राजरत्न थोरात आणि आनंदा भेरजे आदी अधिकारी सहभागी झाले. रायगड, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, परभणी, अमरावती, अकोला, मुंबई, ठाणे अशा विविध जिल्ह्यांतून अधिकारी व सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रतिनिधी : अजय मगरे




















