मुंबई, दि.२६ : अजय मगरे
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ अंतर्गत विद्यार्थ्यांना व्यवसाय शिक्षणाशी जोडण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमात कार्यशिक्षण विषयाखाली कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने दहावीपर्यंत कृषी विषय शिकवला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
मंत्रालयात झालेल्या बैठकीत डॉ. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयासंदर्भात चर्चा झाली. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, सहसंचालक हारून अत्तर, तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे वरिष्ठ प्राध्यापक आर. एन. वाकडे उपस्थित होते.
राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, “नव्या अभ्यासक्रमात बालपणापासूनच कार्यशिक्षणासोबत कृषी, पर्यटन आणि व्यावसायिक कौशल्यांचा पाया घातला जाईल. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती, स्थानिक सण, परंपरा, तसेच स्थानिक पिके व साधनसामग्री यांचीही ओळख करून दिली जाईल.”
कृषीचे महत्त्व आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांना माती, पाणी, नैसर्गिक संसाधने, वनस्पती, स्थानिक पशुपक्षी याविषयी अभ्यासक्रम रचला जाणार आहे. सहावी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परसबाग, सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन, अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, पाळीव प्राणी संगोपन, कुक्कुटपालन, जलव्यवस्थापन, जैवविविधता नोंदणी अशा विषयांचा समावेश असेल.
“शेतीसारख्या परंपरागत क्षेत्राशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देणे अत्यावश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधनांचा वापर शेतीसह व्यावसायिक क्षेत्रात कसा करता येईल, हेही अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाणार आहे,” असेही डॉ.भोयर यांनी स्पष्ट केले.




















