डुप्लिकेट साहित्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची फसवणूक; कारवाईची मागणी
कोपरगार : ता.११,दिलीप गायकवाड
ग्रामीण भागात आजही सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार तसेच शाळा- कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सायकलचा वापर करत आहेत. मात्र सायकल टायर, ट्यूब व संबंधित साहित्याच्या वाढत्या किमतींसह निकृष्ट दर्जाच्या मालामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सायकल साहित्याच्या किमतींवर नियंत्रण आणावे, अशी मागणी सायकल चालक नागरिकांकडून होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये गरीब व सर्वसामान्य नागरिक पाच ते दहा किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी आजही सायकलचाच आधार घेतात. दूध विक्री, बाजारहाट, मजुरीसाठी जाणे तसेच दैनंदिन कामांसाठी सायकलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे मोटारसायकलचा खर्च अनेकांना परवडणारा नसल्याने सायकल हेच ग्रामीण भागातील महत्त्वाचे वाहतूक साधन ठरत आहे.
मात्र अनेक सायकल दुकानांमध्ये नामांकित कंपन्यांच्या नावाखाली डुप्लिकेट किंवा रिजेक्टेड टायर-ट्यूब ग्राहकांना विकले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हे साहित्य अल्पावधीत खराब होत असून दुकानदारांकडून कोणतीही हमी किंवा गॅरंटी दिली जात नसल्याची तक्रार आहे. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर वापर किंवा रस्त्याच्या स्थितीवर दोष देत दुकानदार जबाबदारी टाळत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
याशिवाय पंचर, आऊट व इतर सायकल साहित्याच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे गरीब नागरिकांना सायकलचा वापर करणेही महागडे ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डुप्लिकेट टायर-ट्यूब विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, सायकल साहित्याची तपासणी करण्यात यावी तसेच टायर-ट्यूबच्या किमतींवर आणि पंचर भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सायकल चालक नागरिकांकडून करण्यात येत आहे.














