डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल; १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अंतर्गत गौरव
मुंबई, दि.१९ ( प्रतिनिधी )
डिजिटल साक्षरतेला चालना देत स्नेह आशा फाउंडेशन तर्फे मुंबई आणि ठाणे येथील महापालिकेच्या १० शाळांमध्ये अद्ययावत संगणक प्रयोगशाळांचे लोकार्पण करण्यात आले. यासोबतच फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित भव्य कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अभिनेता सलमान खान, क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, उद्योजक निरंजन हिरानंदानी, मुंबई महानगर पालिकेचे सह आयुक्त डॉ. अमित सैनी , विकासक बोमन ईरानी व म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

या उपक्रमांतर्गत कॉम्प्युटर लॅब ची स्थापना करण्यात आली असून, ६ वी ते १० वीमधील १५,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळणार आहे. संगणक साक्षरता, कोडिंग, ए आय व डेटा अॅनालिटिक्स यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण या प्रयोगशाळांतून दिले जाणार आहे.
शिष्यवृत्ती योजनेच्या ‘सरस्वती’, ‘शक्ती’ व ‘लक्ष्मी’ या तीन उपघटकांद्वारे १२ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक व मार्गदर्शकीय पाठबळ देण्यात आले. यामध्ये शिक्षण शुल्क, लॅपटॉप, कोचिंग व करिअर सल्ल्याचा समावेश आहे.
फाउंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा श्रीमती सिद्धी जयस्वाल यांनी यावेळी सांगितले की, संगणकीय शिक्षणासाठी लॅपटॉप देण्यात आलेल्या “विद्यार्थ्यांनी संगणक शिक्षणा अभावी लॅपटॉप वापरण्यात अडचण येते असे सांगितल्यावर डिजिटल अंतर ही तांत्रिक नव्हे, तर सामाजिक गरज आहे हे जाणवले. आजचा उपक्रम आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.”
सहसंस्थापक स्नेहा जयस्वाल यांनीही नमूद केले,की “केवळ शिक्षणाची उपलब्धता नव्हे, तर संधी व सशक्तीकरण यांचा समन्वय महत्त्वाचा आहे. आमच्या संगणक प्रयोगशाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारलेले प्लॅटफॉर्म आहेत.”
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम,तंत्रज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण व शपथविधी यामुळे डिजिटल समावेशनाच्या दिशेने सामूहिक संकल्प अधोरेखित झाला. आय आय टी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते राज्यस्तरीय खेळाडूंवर आधारित प्रेरणादायी कहाण्यांचाही गौरव या वेळी करण्यात आला.




















