पुतळा अनावरण व नाट्यगृहाच्या दुर्लक्षित अवस्थेवर संताप
कोपरगांव, दि.३ : दिपक साटोटे
कोपरगाव तालुक्यात लोकशाहीर साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली. तालुका व शहरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कार्यकर्ते व नागरिकांनी डॉ. साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या निमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशा, फटाके, बॅनर आणि आकर्षक सजावटीसह ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. अनेक ठिकाणी शुभेच्छा दिल्या गेल्या, वकृत्व स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अद्याप अनावरण न झाल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुतळ्याचे अनावरण रखडले असून, वेळोवेळी नियोजित कार्यक्रम रद्द होणे ही बाब समाजाच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. यामागे गटबाजीचा आरोप होत असून, समाजबांधवांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

यासोबतच कोपरगांव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह देखील दुर्लक्षित अवस्थेत असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. या नाट्यगृहासाठी मंजूर झालेला निधी दुसरीकडे वळवण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर आण्णाभाऊ साठे मालवाहतूक चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप निरभवणे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “पुतळ्याचे अनावरण तात्काळ करावे, तसेच नाट्यगृहाच्या विकासासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे.” त्यांनी लवकरच या विषयावर आंदोलनाचा इशाराही दिला.




















