मुंबई, दि. २४ जुलै | मंगेश म्हात्रे
वांद्रे (पूर्व) येथील भारतनगरमधील सर्व चाळींचा पुनर्विकास म्हाडाच्या ३३(५) योजनेअंतर्गत समन्वयित पद्धतीने करण्यात यावा, अशी लेखी मागणी आमदार वरुण सरदेसाई यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन केली आहे.
भारतनगर हा म्हाडाच्या राजपत्रानुसार अधिकृत लेआउट असून, सध्या येथे तीन वेगवेगळ्या पुनर्विकास योजना सुरु आहेत. यामध्ये एक योजना म्हाडाच्या ३३(५) योजनेअंतर्गत असून, उर्वरित दोन योजना एसआरए’च्या ३३(१०) योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहेत. मात्र, काही स्थानिक रहिवाशांनी या पुनर्विकास योजने विरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे संबंधित प्रकल्प रखडले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतनगर मधील उर्वरित इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे संपूर्ण भारतनगरचा एकत्रित आणि नियोजनबद्ध पुनर्विकास म्हाडाच्या ३३(५) योजनेअंतर्गतच व्हावा, अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी म्हटले की, “एकसंध योजनेतून पुनर्विकास झाल्यास स्थानिक नागरिकांना न्याय मिळेल आणि परिसराचा सर्वांगीण विकास होईल.”
यावेळी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, उपमुख्य अभियंता भूषण देसाई, कार्यकारी अभियंता प्रकाश सानप आदी उपस्थित होते.




















