माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी
ठाणे : अजय मगरे
पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. अनेक भागांत पावसाअभावी पिकांनी माना टाकल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. लातूर शहरासह परिसराची तहान भागविणाऱ्या मांजरा धरणात केवळ साडेतेरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवावा, अशी मागणी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे.
धिरज देशमुख यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत सरकारचे लक्ष वेधले. पावसाअभावी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संकटाच्या काळात बळीराजाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
ढग दिसतील तिथे प्रयोग करा!
पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत ज्या भागात ढगाळ वातावरण निर्माण होईल, तेथे कृत्रिम पावसाचा प्रयोग राबविल्यास शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात टाळता येऊ शकते, असे देशमुख यांनी सांगितले. हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याची निश्चितता नसली तरी सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असा विश्वास बळीराजाला देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कृत्रिम पावसाबाबत तातडीने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात हा प्रयोग युद्धपातळीवर राबवावा, असे आवाहनही धिरज देशमुख यांनी केले.




















