मुंबई : अजय मगरे
राज्यात गुटखा व तत्सम प्रतिबंधित पदार्थांवर कायमस्वरूपी आणि प्रभावी बंदी घालण्यासाठी स्वतंत्र कायदा आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गुजरातमधील दारूबंदी कायद्याच्या धर्तीवर गुटखाबंदीसाठी विशेष कायद्याचा मसुदा तयार करून तो येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थांवरील बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात मंत्री झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण, गृह, विधि व न्याय तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात गुटख्याची अवैध विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात अन्न व औषध प्रशासन व गृह विभागाचे संयुक्त पथक स्थापन करण्याचा तसेच गुटखा विक्रेत्यांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याच पार्श्वभूमीवर गुटखाबंदीसाठी स्वतंत्र कायदा आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.
राज्यात गुटखा, पानमसाला व तत्सम पदार्थांच्या उत्पादन, वाहतूक आणि विक्रीवर बंदी असली तरी अवैध व्यवसाय सुरूच आहे. त्यामुळे गुटखा विक्रीशी संबंधित गुन्ह्यांनाही ‘मकोका’च्या कक्षेत आणण्यासाठी कायद्यात आवश्यक दुरुस्त्या केल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात राज्यभर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेषतः शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री आढळल्यास तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मंत्री झिरवाळ यांनी दिले आहेत.




















