कोपरगाव, दि.६.दिलीप गायकवाड
तंबाखूच्या पुड्यांवर वापरण्यात येणाऱ्या ‘गाय छाप’ तसेच गाय दुधाचे चित्र असलेल्या चिन्हांवर बंदी घालून ते तात्काळ हटवावे, अशी मागणी ‘माझं गाव माझा अभिमान’ संघटनेचे नेते विनय भगत यांनी केली आहे. या संदर्भात अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांसह विविध शासकीय विभागांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, ‘गाय छाप’ तंबाखू व चुना पॅकेजिंगवर गाय व दुधात असलेला माणूसशी संबंधित चिन्हांचा वापर केला जातो. हिंदू समाजात गाय ही पूजनीय मानली जात असल्याने अशा पवित्र प्रतिमांचा वापर व्यसनाधीन व आरोग्यास घातक उत्पादनांवर करणे हे अयोग्य असून, यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तंबाखू हे आरोग्यास अपायकारक असून त्याच्या सेवनामुळे विविध गंभीर आजार उद्भवतात. अशा उत्पादनांवर गाय व दूधाशी संबंधित प्रतिमा दाखवून त्या व्यवसायाला ‘सकारात्मक’ स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. विशेषतः तरुण पिढीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच, गाय व तंबाखू यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नसताना अशा चिन्हांचा वापर करणे ही समाजाची दिशाभूल करणारी बाब असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गाय ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते, त्यामुळे तिच्या प्रतिमेचा वापर व्यसनाधीन पदार्थांसाठी करणे अनुचित असल्याचा मुद्दा संघटनेने उपस्थित केला आहे.
ही उत्पादने तयार करणाऱ्या कंपनीकडून राज्य व जिल्ह्याचा तपशील टाळण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन, ट्रेडमार्क रजिस्टर कार्यालय, पोलीस प्रशासन आदी विविध विभागांकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, संबंधित प्रकरणात तात्काळ कारवाई करून तंबाखू पॅकेजिंगवरील गाय व गाय दूधात असलेला माणूस हे चिन्ह हटवावे, अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.




















