लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री आशिष शेलार
मुंबई : अजय मगरे
राज्यभर २५ जूनपासून राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’मध्ये लोकप्रतिनिधी, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवून जनजागृतीची व्यापक चळवळ उभी करावी, असे आवाहन मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.
मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री ॲड. शेलार आणि सहपालकमंत्री लोढा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आयोजित या बैठकीत सुमारे १६० मान्यवरांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. बैठकीस महापौर रितू तावडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विविध लोकप्रतिनिधी तसेच पोलीस, महापालिका, म्हाडा, एमआयडीसी, एमएमआरडीए आणि अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक उद्याने, मैदाने, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि काही भागांतील अमली पदार्थांच्या वापराबाबतच्या तक्रारी मांडल्या. या बाबी गांभीर्याने घेत संबंधित यंत्रणांनी तातडीने आणि प्रभावी कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शेलार यांनी दिले. नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुसंस्कृत वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, ‘नशामुक्त महाराष्ट्र अभियान’अंतर्गत शाळा, महाविद्यालये आणि समाजातील विविध स्तरांवर व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार असून लोकप्रतिनिधींनीही या अभियानात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत किनारी भागांतील तिवरांच्या अनधिकृत तोडीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यासंदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री शेलार यांनी दिले.
पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाढती वाहतूक कोंडी हा देखील चर्चेचा प्रमुख विषय ठरला. वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याबरोबरच वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष देण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.
मुंबई उपनगर जिल्ह्यात सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक परिसर निर्माण करण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सहभागातून प्रभावी कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.




















