मुंबई, दि. २२ : मंगेश म्हात्रे
आजच्या धावपळीच्या, स्वार्थाच्या आणि पैशासाठी धावणाऱ्या काळात प्रामाणिकपणा दुर्मीळ होत चालला आहे. पण तरीही समाजात अजूनही अशा माणसांची उणीव नाही, जे स्वतःच्या प्रामाणिकपणाने व कर्तव्यनिष्ठेने सामान्यांच्या मनात देवासारखी जागा मिळवतात. बेस्टचे अधिकारी गोरक्ष खाडे हे त्यापैकीच एक.
सायन सर्कल डेपो येथे १० सप्टेंबर रोजी माटुंगा कॅम्प येथील रहिवासी फिलिप्स बळीद हे घराचे वीजबिल भरण्यासाठी गेले होते. घाईगडबडीत त्यांनी एक हजार रुपयांच्या ऐवजी तब्बल दहा हजार रुपये दिले आणि नकळत निघून गेले. दिवस गेले, पाचव्या दिवशी ही चूक त्यांच्या लक्षात आली. हाताशी आशेचा किरण नव्हता, मनात प्रचंड टेन्शन होते, पण त्यांनी धैर्य करून पुन्हा खाडे साहेबांकडे धाव घेतली.
फिलिप्स यांनी आपल्या चुकेची कबुली दिल्यावर, खाडे साहेबांनी एका क्षणाचीही उसंत न घेता स्मितहास्य करत सांगितले – “तुमचे नऊ हजार रुपये माझ्याकडे सुरक्षित आहेत.” हे शब्द ऐकता क्षणी फिलिप्स यांचे डोळे पाणावले. एका क्षणात त्यांच्या कपाळावरील आठ्या गायब झाल्या. खाडे साहेबांनी नऊ हजार रुपये परत केले आणि त्यांच्या प्रामाणिक नजरेने पुन्हा एकदा समाजासमोर ‘खरे अधिकारी’ म्हणजे काय याचा आदर्श घालून दिला.
या प्रसंगानंतर भावुक झालेल्या फिलिप्स यांनी सांगितले – “आजच्या काळात इतक्या प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी दुर्मीळ आहेत. खाडे साहेबांचा मनापासून आदर वाटतो. त्यांच्या मोबाईलवरील डीपीवर दिसणाऱ्या ‘माय माऊली’नेच त्यांना असे संस्कार दिले असावेत. त्यांना व त्यांच्या कुटुंबाला मनापासून सलाम.”
हा प्रसंग ऐकून बेस्ट कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये खाडे साहेबांविषयीचा आदर अधिक दुणावला आहे. पैशासमोरही न डळमळणारी त्यांची प्रामाणिकता समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे.




















