ठाणे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी, २० गुन्हे उघड
ठाणे, दि. १७ : अजय मगरे
ठाणे शहर व परिसरात महिलांना लक्ष्य करून जबरी चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मोक्का गुन्ह्यातील ईराणी आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनूस सय्यद (वय २१, रा. आंबिवली, ता. कल्याण) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २० चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीकडून सुमारे २३२.५ ग्रॅम वजनाचे व अंदाजे ३०.२२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या चेन स्नॅचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने विशेष मोहीम हाती घेतली होती. त्याचदरम्यान गुन्हे शाखा घटक–२, भिवंडीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आरोपीचा माग काढण्यात आला. नारपोली पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक १०२७/२०२५ च्या समांतर तपासात आरोपी बिदर (कर्नाटक) येथे लपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला अटक केली.
तपासादरम्यान आरोपीने भिवंडी, मुंब्रा, ठाणे, उल्हासनगर व अंबरनाथ परिसरात साथीदारासह चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, यापूर्वी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
नारपोली, शिवाजीनगर, भिवंडी शहर, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, मुंब्रा, वर्तकनगर, कापुरबावडी व चितळसर पोलीस ठाण्यांतील चेन स्नॅचिंगचे गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक–२, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या धडक कारवाईमुळे चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरची कामगिरी ही भिवंडीचे वपोनिरी. जनार्दन सोनवणे, सपोनि श्रीराज माळी, सपोनि मिथुन भोईर, पोउनि रविंद्र बी. पाटील, पोउनि रामचंद्र जाधव, पोउनि राजेश शिंदे, सपोउनि सुधाकर चौधरी, सपोउनि सुनिल साळुंके, पोहवा साबीर शेख, पोहवा प्रशांत राणे, पोहवा निलेश बोरसे, पोहवा सुदेश घाग, पोहवा वसंत चौरे, पोहवा शशिकांत यादव, पोहवा राजेश गावडे, पोहवा रंगनाथ पाटील, पोहवा वामन भोईर, पोहवा प्रकाश पाटील, पोहवा किशोर थोरात, मपोहवा माया डोंगरे, मपोह अनुष्का पाटील, मपोहवा दक्षता सुतार, मपोहवा सायली गंभेरा, पोना योगेश कवडे, पोशि १९९७ अमोल इंगळे, पोशी विजय कुंभार, पोशि नितीन नंदीवाले, पोशि सर्फराज तडवी, पोशि भावेश घरत, चापोशि रविंद्र साळुंखे यांचे पथकाने केलेली आहे.




















