पैठण, दि.२७ : ( प्रतिनिधी )
पैठण तालुक्यातील दावरवाडी फाटा येथे आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, या मागणीसाठी हे आंदोलन झाले.
शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्यांमध्ये सरसकट पंचनामे करणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पीकविमा तातडीने देणे तसेच हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करणे यांचा समावेश होता.
या आंदोलनात पंचक्रोशीतील शेकडो शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला. शेकापचे ज्येष्ठ नेते दत्ताभाऊ पाटील गोरडे, शेतकरी कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह शेतकऱ्यांनी एकजुटीने शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलनामुळे दावरवाडी फाटा परिसरात काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.




















