मुंबई,दि.१ : अजय मगरे
राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. यावर १३ ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार असून २८ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादीच नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी वापरली जाणार आहे.
प्रभागनिहाय यादीत मतदारांची नावे व पत्ते विधानसभा यादीप्रमाणेच कायम राहणार आहेत. मात्र, या याद्यांमध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, नावे वगळणे अथवा पत्ता दुरुस्ती करणे अशा प्रकारची कार्यवाही आयोगाकडून केली जाणार नाही.
प्रभाग याद्यांचे विभाजन करताना झालेल्या लेखनिकांच्या चुका, मतदाराचा चुकीने प्रभाग बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नसणे अशा त्रुटींवर मतदार हरकती व सूचना दाखल करू शकतात.




















