आरक्षणाचा लाभ गरजूंपर्यंतच मर्यादित राहावा – राज्यपाल राधाकृष्णन
मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी)
“अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेवर शिक्षण व नोकऱ्यांमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि आरक्षणाचा लाभ अधिक गरजू युवकांपर्यंतच पोहोचावा,” असे स्पष्ट आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ८० व्या वर्धापन दिन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

राज्यपाल म्हणाले, “आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, पण विद्यार्थी आणि युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही हेच स्वप्न होते की त्यांच्या समाजातील युवक गुणवत्तेच्या जोरावर पुढे जावेत. सन २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल आणि हे स्वप्न साकार होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीने शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल राज्यपालांनी संस्थेचे कौतुक केले.गौरव पुरस्कार वितरण
या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० जणांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी, दक्षिण कोरिया येथील धम्मदीप भंते, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, ॲड.सुरेंद्र तावडे, बळीराम गायकवाड यांचाही समावेश होता.
स्वायत्त विद्यापीठाचा प्रस्ताव – चंद्रकांत पाटील
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीने स्वायत्त विद्यापीठाचा प्रस्ताव त्वरीत सादर करावा अशी सूचना केली. “स्वायत्त विद्यापीठ झाल्यास संस्थेला नवे अभ्यासक्रम राबविता येतील व शासनाच्यावतीने त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
मिलिंद महाविद्यालयाचा कायापालट – संजय शिरसाठ
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी भीमा कोरेगाव स्मारकासाठी १०० कोटी आणि महाड चौदार तळासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. “छत्रपती संभाजीनगरच्या मिलिंद महाविद्यालयाचा कायापालट करण्याचा संकल्प केला असून राज्यभरात १२० आधुनिक वसतिगृहे उभारण्याचा मानस आहे,” असे ते म्हणाले. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच समाजात ओळख मिळाली व यशाच्या पायऱ्या चढता आल्या,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व संस्थेचे विश्वस्त ॲड.उज्वल निकम यांनीही आपल्या भाषणातून संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास विविध मान्यवर, पदाधिकारी, माजी विद्यार्थी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.




















