वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली कॉरिडॉरचे होणार काम, प्रवाशांना दिलासा…..
नवी दिल्ली/पुणे,दि.२५ ( प्रतिनिधी )
पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-2 ला मंजुरी दिली आहे. यामध्ये वनाज ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब) या दोन उन्नत मार्गांचा समावेश आहे. हे विस्तार विद्यमान टप्पा-1 मधील वनाज-रामवाडी मार्गाचा पुढचा टप्पा असून, पुण्याच्या पूर्व-पश्चिम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणारा ठरणार आहे.
हा प्रकल्प एकूण 12.75 किलोमीटर लांबीचा असून त्यात 13 स्थानकांचा समावेश आहे. या कॉरिडॉरद्वारे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोलीसारखी उपनगरं मेट्रो नेटवर्कशी जोडली जाणार आहेत. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये असून, त्याचे वित्त पोषण केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि परदेशी द्विपक्षीय/बहुपक्षीय आर्थिक संस्थांमार्फत समान स्वरूपात होणार आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) करणार आहे.
संपूर्ण मेट्रो जाळ्याचा विस्तार – प्रवाशांसाठी अनेक फायदे
चांदणी चौक ते वाघोली दरम्यान एक सलग मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. हा विस्तार मुख्य आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि रहिवासी भागांशी थेट जोडणी निर्माण करणार आहे. तसेच, जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवरून हा मार्ग लाईन 1 (निगडी-कात्रज) आणि लाईन 3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) शी जोडला जाणार आहे.
वाहतूक कोंडीला दिलासा आणि पर्यावरणपूरक उपाय
मुंबई, बेंगळुरू, अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर येथून येणाऱ्या बस सेवा मेट्रोशी जोडण्याची योजना असून, त्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत अधिक सोयीस्कर आणि जलद पोहोच मिळेल. यामुळे पौड रोड आणि नगर रोडवरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.
प्रवाशांची वाढती संख्या – भविष्यातील अंदाज
या विस्तारामुळे 2027 मध्ये सुमारे 0.96 लाख, 2037 मध्ये 2.01 लाख, 2047 मध्ये 2.87 लाख आणि 2057 पर्यंत 3.49 लाख अतिरिक्त प्रवासी दररोज मेट्रोचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.
सध्या स्थळ सर्वेक्षण व तपशीलवार डिझाइनचे प्राथमिक काम सुरू असून, हा प्रकल्प पुण्याच्या गतिशीलतेसह आर्थिक विकासासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे.




















